सुनील काकडे/ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 28 - जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले असून इतरही ठिकाणच्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, केवळ विजेअभावी शेतकऱ्यांना सिंचन करता येणे अशक्य झाले आहे. दरम्यान, उशिराने जाग आलेल्या महावितरणने यासंबंधीचा ११७ कोटी रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. तो देखील गेल्या चार महिण्यांपासून मंत्रालयात मंजूरीच्या प्रतीक्षेत अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोऱ्याच्या दुभाजकावर येतो. जिल्ह्यात सिंचनाचा सुमारे ५०० कोटीचा अनुशेष आजही कायम आहे. तो काही अंशी दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी बॅरेजेसची कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये या प्रकल्पांना सुप्रमा प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्यामुळे ही कामे विनाविलंब पूर्ण झाली. तथापि, सिंचनाच्या बाबतीत माईलस्टोन ठरू पाहणाऱ्या बॅरेजेसच्या उपलब्धीमुळे शेकडो गावांमधील शेतकऱ्यांनी हरितक्रांतीचे स्वप्न रंगविणे सुरू केले. मात्र, सिंचनाकरिता लागणाऱ्या विजेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बॅरेजेसची उपयोगिता शून्य ठरली असल्याचे दिसून येत आहे. महावितरणने उशिरा का होईना पाच ते सहा महिन्यांपूर्वी बॅरेजेस प्रकल्प परिसरासह जिल्ह्यातील इतर प्रकल्प परिसरात वीज पुरविण्यासंबंधी ३३/११ केव्हीचे ३ वीज उपकेंद्र, ५ एमव्हीचे ६ ट्रान्सफार्मर, १०० केव्हीचे ९४२ ट्रान्सफार्मर, यासह इतर महत्वपूर्ण आवश्यक बाबींचा ११७ कोटी रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. त्यास हिरवी झेंडी देत साधारणत: चार महिन्यांपूर्वी तो मंत्रालयाच्या दरबारात पोहोचला. मात्र, तेथून या प्रस्तावाची फाईल पुढे सरकली नसल्यामुळे हा प्रश्न अद्याप जैसे थे रखडला आहे. वाशिम जिल्ह्यातील विजेसंदर्भात शासनाकडे सादर करण्यात आलेल्या ११७ कोटी रुपयांच्या प्रस्तावासंबंधी शासनाकडून अद्याप अधिकृतरित्या काहीच कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे यासंबंधी आपणास विशेष अशी काहीच माहिती देता येणार नाही. डी.आर.बनसोडे अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम
सिंचनासाठी वीज पुरविण्याचा ११७ कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: December 28, 2016 8:52 PM