लोणी काळभोर : मे महिन्यात पुणे जिल्ह्यातून ३९ अल्पवयीन, तर १८ ते २५ वयोगटांतील ७८ अशा एकूण ११७ मुली घरातून पळून गेल्या असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आढावा घेतला असता, खेड तालुक्यातून सर्वांत जास्त ९ मुली पळून गेल्या आहेत, तर लोणावळा ग्रामीणमधून ५ मुली पळून गेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यातून उर्वरित मुली घर सोडून पळून गेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आणि प्रत्यक्ष आकडेवारी सांगत आहे. नुकत्याच गाजत असलेल्या चित्रपटांचा हा प्रभाव का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी 'लोकमत'ला याविषयीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की पुणे जिल्ह्यातून मे महिन्यात ३९ अल्पवयीन मुली गायब झाल्या होत्या. त्यापैकी १६ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यातील बहुतांश मुली या १८ ते २५ वयोगटांतील आहेत. अशा ७८ पैकी २३ मुलींना घरी परत आणण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. ही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार प्राप्त झालेली आकडेवारी आहे. मात्र, लोक लज्जेपोटी तक्रार न देता शोधत राहणाऱ्या पालकांचेही प्रमाण असू शकते, असा पोलिसांचा दावा आहे. लोणी काळभोरमध्येही अशा काही घटना घडल्या होत्या; परंतु त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यास मात्र ते धजावलेले नव्हते. >मुलांशी पालकांनी मैैत्री करावीया वाढत्या प्रकारांमुळे पालकवर्ग मात्र काळजीने ग्रासला आहे. हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर म्हणाल्या की, हा केवळ चित्रपटाचा परिणाम नाही. याबाबतीत पालकांचे दुर्लक्ष अधिक कारणीभूत आहे. मुले वयात आल्यानंतर बाहेर काय करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण? या बाबतीत लक्ष दिले जात नाही. मोबाईल अथवा टीव्हीमुळे या गोष्टींना चालना मिळते, हे सत्य असले, तरीही आपण या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवू शकत नाही. पालकांचे संस्कारही महत्त्वाचे आहेत म्हणूनच मुले वयात येताना, त्यांच्याशी पालकांनीच मैत्री करणे गरजेचे आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. टीव्हीवरील शेकडो चॅनेलवरील वेगवेगळ्या चित्रपटांच्या भडिमारांमुळे मुले तसे करू पाहतात. त्यातच मोबाईलमुळे संपर्क सहजसोपा झाला आहे.
जिल्ह्यातून ११७ मुली घरातून ‘पळाल्या’
By admin | Published: June 13, 2016 1:25 AM