मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार अंशदायी निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अंशदानाच्या सममूल्य रक्कम शासनाचा हिस्सा म्हणून ११८२ कोटी रुपये आणि कर्मचा-यांचा मासिक अंशदान व त्यावरील व्याजाची रक्कम १३० कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात सांगितले.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री तावडे यांनी बुधवारी विधिमंडळात निवेदन केले. या संघटनांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. शालार्थ प्रणालीमध्ये नावांचा समावेश करण्याकरीता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांची ४२ दिवसांची संपकालीन रजा अर्जित रजा म्हणून मंजूर करण्यात आली आहे.तसेच एम. फील व पीएचडीधारक कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांना विविध चर्चासत्रामध्ये संशोधन अहवाल वाचण्यासाठी किंवा उपस्थितीसाठी वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे कार्यरजा मंजूर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १२ व २४ वर्षानंतर अनुज्ञेय असणा-या वेतनवाढीसाठी २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार टाकलेल्या अटी पूर्वलक्षी प्रभावाने अंमलाजावणी करण्यात येणार नाही, असे तावडे म्हणाले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या निवृत्ती वेतनासाठी ११८२ कोटी, शिक्षणमंत्री तावडे यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 4:03 AM