मुंबई: त्रिपुरामध्ये कथितरित्या मुस्लिमांवर घडलेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये दिसले. या तिन्ही शहरांत मोठा जातीय तणाव निर्माण झाला, त्यानंतर पोलिसांना कर्फ्यू लावावा लागला. या हिंसाचारावर कारवाई करत नाशिक ग्रामीण पोलिस आणि नांदेड जिल्हा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत 119 जणांना अटक केली आहे.
अटक झालेल्या सर्वांचा मालेगाव आणि नांदेडमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात सहभाग असल्याचे म्हटले आहे. नांदेड आणि मालेगावमधील हिंसाचार काही तासांतच शांत झाला असला तरी अमरावतीमधील हिंसाचार बराच काळ चालला. त्यामुळेच पोलिसांना 12 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत येथे संचारबंदी लागू करावी लागली.
हिंसाचारात 11 जखमी
पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध नांदेडमधील विविध पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले असून 67 जणांना अटक केली आहे. नांदेड पोलिसांनी सांगितले की, मुस्लिम समाजातील सुमारे 11 लोक त्यांच्याच समुदायाच्या हिंसक जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचा प्रयत्न करत असताना जखमी झाले. पोलिसांप्रमाणे त्यांच्याकडेही सुरक्षेचे कोणतेही उपाय नव्हते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लाखोंच्या मालमत्तेचे नुकसाननांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी म्हणाले, दगडफेकीत आठ पोलीस जखमी झाले आहेत. दंगलखोरांनी दगडफेक करून चार वाहनांचे नुकसान केले आणि एक स्कूटर जाळली. जमावाने दगडफेक करुन 5 ते 6 पोलिसांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. या हिंसाचारात सुमारे दोन लाखांच्या खासगी मालमत्तेचे, तर पोलिसांच्या मालमत्तेचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मालेगावात 52 जणांना अटक
दरम्यान, मालेगाव येथील हिंसाचारप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाच एफआयआर नोंदवले असून समाजातील 52 जणांना अटक केली आहे. मालेगाव येथे झालेल्या दगडफेकीत तीन पोलिस अधिकारी आणि सात जण जखमी झाले. त्याचवेळी मुस्लीम समाजाचा पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. मालेगाव येथील रझा अकादमीचे आरोपी बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध सध्या सुरू आहे.