पुणे : मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे रखडलेली इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया अखेर येत्या गुरुवारपासून (दि.२६) सुरु होणार असून एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रवेशाची दुसरी नियमित फेरी २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार असून तिसरी प्रवेश फेरी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे पिंपरी चिंचवड व इतर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या एसीबीसी संदर्भातील निर्णयाच्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया काही महिने स्थगित ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवेशास विलंब झाला आहे.यापूर्वी प्रवेश नाकारलेल्या, प्रवेश रद्द केलेल्या किंवा प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.-----------------
२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर- दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीच्या रिक्त जागा दर्शविणे.- यापूर्वी एसीबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना इतर प्रवर्ग निवडता येईल.- प्रवेश अर्ज भाग-१ मध्ये आवश्यक बदल करून दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे- नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग एक व दोन भरता येईल.
२ डिसेंबर :- अर्ज तपासणीसाठी राखी वेळ- पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया बंद होईल.३ ते ४ डिसेंबर : पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी अंतिम करण्यासाठी राखीव वेळ
५ डिसेंबर : दुसऱ्या नियमित प्रवेश फेरी साठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.
५ ते ९ डिसेंबर : - गुणवत्ता यादीनुसार मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करणे.- मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे.- या कालावधीत व्यवस्थापन व अल्पसंख्यांक खोटा प्रवेश सुरू राहतील.-------------------- विद्यार्थ्याने निवडलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.- पहिल्या प्रसंती क्रमानुसार प्रवेश मिळू नाही प्रवेश घेतला नाही किंवा नाकारल्यास संबंधित विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी दिली जाणार नाही. या विद्यार्थ्यांना केवळ विशेष फेरीमधून प्रवेशाची संधी मिळू शकेल.- घेतलेला प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील अनियमित फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे या विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.-------------------------- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून इयत्ता अकरावीची प्रवेश पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला असून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्जात अचूक माहिती भरावी. तसेच वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे वाचन करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येणार नाही.- दत्तात्रय जगताप, माध्यमिक शिक्षण (प्रभारी) संचालक, महाराष्ट्र राज्य