कल्याण : कल्याण-डोंबिवली मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांकडून अटक सत्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, नगरसेवक प्रकाश भोईर यांच्यासह डोंबिवली रामनगर पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे तर महात्मा फुले चौक पोलिसांनी कल्याणमधील 5 मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
15 दिवसांचं अल्टीमेटम संपलं, आंदोलन सुरू
पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 23 निष्पाप जिवांचा बळी गेला आणि मुंबई हादरली. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत, पंधरा दिवसांत रेल्वे पूल आणि परिसरातले फेरीवाले प्रशासनाने हटविले नाहीत, तर मनसे आपल्या पद्धतीने काम करेल, असा इशारा दिला. मनसेच्या इशा-याला पंधरा दिवस पूर्ण होताच, शनिवारी (21 ऑक्टोबर)मनसेने ठाणे, कल्याण, डोंबिवलीत आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांचा समाचार घेतला. ठाणे, कल्याण, वसई, घाटकोपर रेल्वे स्थानकांवर फेरीवाल्यांना हुसकावून लावत त्यांचे सामान रस्त्यावर फेकून पुन्हा ठेले न लावण्याची तंबीही मनसे कार्यकर्त्यांनी दिली. यानंतर आता पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरोधात अटकेची कारवाई सुरू केली आहे.
ठाणे फेरीवाला मारहाण प्रकरण :नौपाडा पोलिसांकडून मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक
दादर, अंधेरीतील फेरीवाले गायब, मनसे आंदोलनापूर्वीच पालिकेची कारवाई
दुसरीकडे मुंबईत मात्र, महापालिका आणि रेल्वे प्रशासन जागरूक असल्याने मनसे आंदोलनापूर्वीच दादर, कुर्ला आणि अंधेरी येथील पुलासह परिसरात फेरीवाले शनिवारी गायब असल्याचे चित्र होते. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, मुंबईतील सर्वाधिक गर्दी दादर येथे असते. एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर महापालिकेने ठिकठिकाणांवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र, मागील काही दिवसांपासून दादरसह तुरळक ठिकाणी फेरीवाले नजरेस पडत होते. शनिवारी मात्र दादर रेल्वे स्थानकाचा पादचारी पूल, स्वामी नारायण मंदिराचा परिसर, कैलास लस्सी परिसर, मामा काणे हॉटेल रस्ता, फूलमार्केटसह लगतचा परिसर पूर्णत: रिकामा होता. सुविधा शोरूमसह येथील पोलीस ठाण्यालगत फेरीवाल्यांवर कारवाई करणारे महापालिकेचे वाहन दिवसभर तैनात होते. परिणामी, वरीलपैकी कुठेही फेरीवाल्यांनी ठाण मांडले नव्हते.
पालिकेच्या वाहनांची करडी नजरमहापालिका आणि रेल्वे प्रशासन जागरूक असल्याने, मागील काही दिवसांपासूनच दादरसह मोक्याच्या ठिकाणांवर फेरीवाले बसत नव्हते. दादर, घाटकोपर, अंधेरी, कुर्ला या मोठ्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात महापालिकेचे वाहन तैनात असल्याने, परिसर ‘विनाफेरीवाला क्षेत्रा’सारखा दिसत होता. मुळातच दिवाळीदरम्यान सर्वत्रच गर्दी वाढत असताना, रेल्वे स्थानकांच्या परिसरात गायब झालेल्या फेरीवाल्यांमुळे पादचा-यांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते. दरम्यान, शनिवारी फेरीवाले नसल्याने रिकामे झालेले हे परिसर भविष्यात असेच राहतात का? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष आहे.
फेरीवाल्यांना मारण्यापेक्षा सीमेवर लढावे- रामदास आठवले
दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला. मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होतोय याचा राग त्या गरीब परप्रांतीय फेरीवाल्यांवर का काढता, अशी टोलेबाजीही त्यांनी केली. फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात आहे. पुन्हा असे घडले तर आम्ही त्याचे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला. फेरीवाले आपले पोट इमानदारीने भरतात, ते चोरीचपाटी करीत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मनसेला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा-निरुपमरेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छुपा पाठिंबा आहे. त्या जोरावरच मनसैनिकांनी फेरीवाल्यांना मारहाण करत कायदा हातात घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी रविवारी केला.पंधरा दिवसांपूर्वी संताप मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावणार असल्याचे म्हटले होते. राज यांनी जाहीर भाषणात दिलेल्या या धमकीला गांभीर्याने घेत त्यावर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु राज्य सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे आज मनसे कार्यकर्ते जेव्हा तोडफोड आणि मारहाण करत होते तेव्हा पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा दावा निरुपम यांनी केला.मनसेने या आंदोलनाच्या नावाखाली फक्त गरीब आणि परप्रांतीय फेरीवाल्यांना लक्ष्य केले आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला, असा सवालही निरुपम यांनी केला. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार रेल्वे, महापालिका आणि प्रशासनाला आहे. मनसेला तो हक्क नाही, असेही निरुपम म्हणाले.