मुंबई : रात्रीच्या शाळेत अभ्यासासाठी आलेल्या मुलांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ उडाल्याने यात १२ मुले जखमी झाली. सोमवारी रात्री ही घटना घाटकोपर येथे घडली असून याबाबत पंतनगर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.ज्या विद्यार्थ्यांचे घरे लहान आहेत. अथवा त्यांना घरी अभ्यास करता येत नाही, अशा मुलांना अभ्यास करता यावा यासाठी शासनाने एकलव्य अभ्यासिका सुरु केली आहे. त्यानुसार मुले जवळच्या पालिका शाळेत जाऊन सायंकाळनंतर अभ्यास करु शकतात. अशाच प्रकारे घाटकोपरमधील रमाबाई सहकार नगर येथे राहणारी काही मुले मंगळवारी याच परिसरातील पालिका शाळेत गेली होती. अभ्यास सुरु असतानाच यातील एका मुलाने याठिकाणी असलेले ज्वलनशील द्रव्य पेटत्या दिव्यावर टाकले. त्यामुळे उडालेल्या आगीच्या भडक्यात अभ्यास करण्यासाठी आलेली १२ मुले भाजली आहेत. यातील ३ मुलांचा चेहरा आणि हात मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. तर इतर मुलांच्या हातावर जखमा झाल्या आहेत. या मुलांवर राजावाडी आणि एका खासगी रुग्णालयात उपचार सुुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. तसेच हे ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे उघड्यावर ठेवणाऱ्या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. (प्रतिनिधी)
पालिका शाळेत १२ मुले भाजली
By admin | Published: December 19, 2014 4:44 AM