मुंबई : सीएसटी ते अंधेरी या हार्बर मार्गावर लवकरच बारा डबा लोकल धावणार आहे. हार्बरवरील अंधेरी स्थानकातील बारा डबा प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. सीएसटी ते पनवेल या हार्बर मार्गावर २९ एप्रिलपासून बारा डबा लोकल धावण्यास सुरुवात झाली. आहे. तसेच याआधी ट्रान्स हार्बर मार्गावर बारा डबा लोकल धावत होत्या. फक्त सीएसटी ते अंधेरी मार्गावरच बारा डबा लोकल धावत नव्हती. त्यामुळे येथेही १२ डबा लोकल असाव्यात, अशी मागणी होत होती.मध्य रेल्वेने सीएसटी ते अंधेरीदरम्यान आपल्या हद्दीतील कामे पूर्ण केल्यानंतर पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीने वान्द्रे ते अंधेरी या हार्बरच्या आपल्या हद्दीतील स्थानकांवर लक्ष केंद्रित केले होते. अंधेरी स्थानक वगळता बारा डब्यासाठी प्लॅटफॉर्मची सर्व कामे पूर्ण करण्यात आली होती. यासाठी २९ मे पासून अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ तोडून उत्तर दिशेला दोन नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम करण्यास सुरुवात करण्यात आली. हे काम ६ जूनपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात काम ९ जूनपर्यंत पूर्ण करण्यात आले. या कामासाठी सीएसटी ते अंधेरी आणि अंधेरी ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या ४0 लोकल फेऱ्या प्रत्येक दिवशी रद्द करण्यात आल्या. यामध्ये अंधेरी ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या ३0 तर अंधेरी ते सीएसटीदरम्यान धावणाऱ्या १0 लोकल फेऱ्यांचा समावेश होता. अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्मचे लांबी वाढविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर या मार्गावरही बारा डबा लोकल धावणे शक्य होणार आहे. पुढील आठवड्यापासून बारा डबा लोकल चालविण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)>प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम बाकीसीएसटी ते पनवेल या हार्बर मार्गावर २९ एप्रिलपासून बारा डबा लोकल धावण्यास सुरुवात झाली. फक्त सीएसटी ते अंधेरी हार्बर मार्गावरच बारा डबा लोकल धावत नव्हती. अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्मचे लांबी वाढविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर या मार्गावरही बारा डबा लोकल धावणे शक्य होणार आहे.
सीएसटी-अंधेरी दरम्यान १२ डबा
By admin | Published: June 11, 2016 4:27 AM