मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे एकूण 12 रूग्ण आहेत. यामध्ये पुण्यात 9, मुंबईत 2 तर नागपुरात 1 रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. तसेच, या सर्वांची प्रकृती ठिक असून घाबरण्याचे कारण नाही. त्यांची मोठी लक्षणे नाहीत परंतु ते पॉझिटिव्ह आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या कोरोना बाधित 12 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे एका टूर कंपनीद्वारे परदेशात गेले होते. त्यामुळे टूर कंपन्यांना पुढील टूर स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या टूर गेल्या आहेत, त्यांच्याबाबत खबरदारी घेण्यात येईल, असे राजेश टोपे म्हणाले. याशिवाय, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. लोकांमध्ये जागरुकता करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारकडून अत्यंत प्रभावीपणे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जाहिरातींद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
याचबरोबर, लोकांची गर्दी टाळणे, संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. खबरदारी म्हणून शासकीय कार्यक्रम महाराष्ट्रात होणार नाहीत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच, स्वीमिंग पूल जावे की नको, तपकीर ओढून कोरोना जातो का किंवा गावोगावी स्थानिक उपचारांबाबत विचारले जाते. मात्र ते अत्यंत चुकीचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, पुण्यात आज संध्याकाळी आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला आहे. अमेरिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 9 वर पोहोचली आहे. तर राज्यातील रुग्णांचा आकडा 12वर पोहोचला आहे.
चीनमधील कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.