मध्य प्रदेशातील एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू, सर्व मृतदेहांची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 07:23 PM2022-07-18T19:23:15+5:302022-07-18T19:24:26+5:30

ST Bus Accident in Madhya Pradesh : स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोधमोहिम सुरु असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले.

12 killed in ST bus accident in Madhya Pradesh, all bodies identified | मध्य प्रदेशातील एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू, सर्व मृतदेहांची ओळख पटली

मध्य प्रदेशातील एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू, सर्व मृतदेहांची ओळख पटली

googlenewsNext

मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूर येथून महाराष्ट्रात येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. नदी पात्रातून आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्वांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एसटीचे चालक आणि वाहक यांचाही समावेश असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदूर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही आज सकाळी ७.३०च्या सुमारास इंदूर येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर ही बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याबाबत विनंती केली. 

स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोधमोहिम सुरु असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले. हा अपघात अत्यंत दुर्देवी असून असे प्रसंग टाळण्यासाठी महामंडळातर्फे उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, या समितीला तातडीने चौकशी करण्यास सांगितल्याचेही शेखर चन्ने म्हणाले.

दुर्घटनेतील सर्व मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे…
१. चंद्रकांत एकनाथ पाटील - (४५) (चालक) अमळनेर 
२. प्रकाश श्रावण चौधरी (वाहक), अमळनेर 
३. अविनाश संजय परदेशी, अमळनेर 
४. राजू तुलसीराम (३५) राजस्थान 
५. जगन्नाथ जोशी -(६८) राजस्थान 
६. चेतन जागीड, राजस्थान 
७. निंबाजी आनंदा पाटील,अमळनेर
८. सैफउद्दीन अब्बास अली बोहरा, मध्यप्रदेश 
९. कल्पना विकास पाटील - (५७) धुळे
१०. विकास सतीश बेहरे - (३३) धुळे
११.आरवा मुर्तजा बोहरा - (२७) अकोला 
१२. रुख्मणीबाई जोशी, राजस्थान.

Web Title: 12 killed in ST bus accident in Madhya Pradesh, all bodies identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.