नांदेड : मुखेड-कंधार मतदारसंघाचे अॅड तुषार राठोड यांचा नातेवाईक असल्याचे सांगून परीक्षेमध्ये गुण वाढवून नोकरी लावण्याचे आमिष दाखविणाऱ्या तरुणाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे़ आमदारांचे नाव घेवून हा तरुण पैशाची मागणी करीत असल्याच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या क्लीपमध्ये बी.एड.साठी १२ लाख, डी.एड.साठी १५ लाखांचा रेट असल्याचे तो सांगत आहे.काशीराम देवला चव्हाण असे या तरुणाचे नाव असून त्याने काही विद्यार्थ्यांना शिक्षक भरती परीक्षेमध्ये गुण वाढवून नोकरी लावून देण्याचे आमिष देत, पैशाची मागणी केली़ आ़तुषार राठोड हे माझ्या जातीचे असून नातेवाईक आहेत़ मी त्यांच्या माध्यमातून ही कामे करीत असल्याचे सांगितले़ काशीराम चव्हाण व कल्पेश राठोड यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची क्लिप त्रयस्थ व्यक्तीने राठोड यांना त्यांच्या मेलवर पाठविली़ त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला़ आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याचे लक्षात येताच राठोड यांनी मुखेड पोलिसात तक्रार दिली.
बी.एड.साठी १२ लाख, डी. एड.साठी १५ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:20 AM