मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत तीन आमदार सभागृहात तटस्थ, तर १२ आमदार अनुपस्थित राहिले. निवडणूक एकतर्फी झाल्याने सर्व २८७ आमदारांनी मतदान केले असते तरी राहुल नार्वेकरच विजयी झाले असते, हे त्यांना मिळालेल्या १६४ मतांवरून स्पष्ट होते.
एमआयएमचे धुळे शहरचे फारुक शहा, समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि रईस शेख हे तीन आमदार मतदानावेळी तटस्थ राहिले, तर एकूण १२ आमदार या निवडणुकीला अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजप-काँग्रेसचे प्रत्येकी २ आणि एमआयएमचा १ यांचा यात समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे ते मतदानाला हजर राहू शकले नाहीत, तर नीलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, बबन शिंदे, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे, तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर हे अनुपस्थित राहिल्याने या मतांचा फटका राजन साळवी यांना बसला. मालेगाव मतदारसंघाचे एमआयएमचे आमदार इस्माईल कास्मी हेही गैरहजर होते.
आजारी असूनही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीला उपस्थित राहिलेले भाजप आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी मात्र गैरहजर होते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची दोन मते कमी झाली. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नियमानुसार मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याने त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही.
नीलेश लंके यांनी दिले आजारपणाचे कारणराष्ट्रवादी काँग्रेस पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी दिले आजारपणाचे कारण दिले. मालेगाव मध्य मतदार संघातील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद गैरहजर राहिले. आमदार बबनराव शिंदे हे परदेशातून मुंबईत परतत असल्याने ते मतदानासाठी सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत, तर आमदार प्रणिती शिंदे या घरगुती कार्यक्रमात सहभागी असल्याने सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशी कारणे सांगण्यात आली.