राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच आदल्या रात्री शिंदे गटाचे १२ आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे.
“ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा इतर कोण असतील हे सर्व आता एकमेकांच्या उरावर बसण्यास सुरूवात करतील. त्यामुळे हे मंत्रिमंडळ औटघटकेचं मंत्रिमंडळ असेल यात कोणतीही शंका नाही,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली. त्यांनी माध्यमांशी साधललेल्या संवादादरम्यान शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. “सध्या काही जण अस्वस्थ आहेत आणि त्यापैकी १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावाही राऊत यांनी केला.
संभाव्य मंत्र्यांची नावेभाजपतर्फे : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण.मुख्यमंत्री शिंदे गटाकडून : उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई.