ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २४) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून विषयनिहाय गुणांच्या माहितीची प्रत घेता येईल.
राज्य मंडळाच्या नऊ विभागामार्फत राज्यात पहिल्यांदाच दि. ९ ते २९ जुलै या कालावधीत बारावीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. यापुर्वी आॅक्टोबर महिन्यात ही परीक्षा घेतली जात होती. राज्यभरातून जुलैमध्ये झालेल्या परीक्षेला सुमारे १ लाख २१ हजार विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांचा निकाल बुधवारी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजल्यानंतर निकाल पाहता येईल. यामध्ये विषयनिहाय गुण देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्याची प्रिंटआऊट घेता येईल. मुळ गुणपत्रिकांचे वाटप संबंधित महाविद्यालयांत करण्यात येणार असून त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.
आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. २५ आॅगस्ट ते दि. ३ सप्टेंबर या कालावधीत तर उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत हवी असल्यास दि. २५ आॅगस्ट ते दि. १४ सप्टेंबर या कालावधीत विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल. दोन्ही अर्जासोबत आॅनलाईन निकालाची प्रत जोडणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्यासाठी छायांकित प्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल.
या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणसुधार योजनेचा लाभ घेता येईल. फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणारी परीक्षा देवू इच्छिणाऱ्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. त्याबाबतची माहिती राज्य मंडळामार्फत प्रसिध्द केली जाईल.