ऑनलाइन लोकमत/सुनील पाटीलजळगाव, दि. 7 - वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयाचे हेलपाटे आणि त्यामुळे बसणारा आर्थिक भुर्दंड याला आळा बसावा आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सुरू केलेल्या समाधान हेल्पलाईनला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१६ या २६ महिन्यांत या हेल्पलाईनकडे १ हजार ३३२ तक्रारी प्राप्त झाल्या तर एक हजार २०८ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे.डॉ. सुपेकर यांनी ४ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात समाधान हेल्पलाइन नावाने स्वतंत्र कक्ष सुरू केला. त्यासाठी उपअधीक्षक (गृह) यांच्यावर स्वतंत्र जबाबदारी सोपविली. मानव संसाधन विभागाचे निरीक्षक व दोन कर्मचारी, स्वतंत्र दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आला. आलेली तक्रार नोंदवहीत नोंदविली जाते. त्यात तक्रारदाराचे नाव, तक्रारीचे स्वरुप व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून टोकन क्रमांक दिला जातो. दुपारी ४ वाजता उपअधीक्षक यांच्याकडे दिवसभराच्या तक्रारीचा आढावा घेतला जातो. ज्या तक्रारीची पूर्तता झालेली आहे, त्याबाबत तक्रारदारास हेल्पलाईन, दूरध्वनी अथवा ईमेलद्वारे २४ तासाच्या आत तक्रारदारास कळविले जाते.वरिष्ठ अधिकारी घेतात आढावाप्रत्येक आठवड्यात उपअधीक्षक व त्यानंतर पंधरा दिवसांनी अपर पोलीस अधीक्षक आलेल्या तक्रारींचा आढावा घेतात. ज्या तक्रारीत विलंब झाल्याचे निदर्शनास आले त्या संबंधितास जबाबदार धरुन कारवाई केली जाते. महिन्याच्या शेवटी पोलीस अधीक्षक हे अपर पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांच्यासोबत तक्रारींचा आढावा घेतात.कोणत्या कामांचे होते निराकरणहक्काची रजा, वेतन निश्चिती, वेतनवाढ, वेतन पडताळणी, शीट रिमार्कस, बक्षीस, कसुरी, घरभाडे, महाराष्ट्र दर्शन रजा, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी, इतर पगारातील वजावटी, पदोन्नतीची सद्यस्थिती व वेल्फेअरसंबंधी कामकाज आदी कामांचे निरासरण या कक्षात होते.
हेल्पलाइनच्या माध्यमातून जळगावात १२०० पोलिसांचे समाधान
By admin | Published: February 07, 2017 5:11 PM