नरेश डोंगरे, नागपूरविराट कोहली आणि सुरेश रैना या भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंच्या नाकी नऊ आणून आॅस्ट्रेलियात धावांचा पाऊस पाडला तर, मध्यभारतातील सट्टा बाजार संचलित करणाऱ्या नागपुरातील काही बुकींनी ‘स्पॉट चेंज‘ करीत रविवारी जवळपास १२५ कोटींची खायवाडी केली. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, सटोड्यांनी लगवाडी करण्यासाठी एकच गर्दी केल्यामुळे अनेक बुकींची लाईन जाम झाली होती. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघादरम्यानचा एक दिवसीय सामना क्रिकेट जगतातील अब्जावधी क्रिकेट रसिकांप्रमाणेच सटोड्यांच्याही आकर्षणाचा विषय असतो. या संघादरम्यान ज्या दिवशी सामना असतो, त्या दिवशी अब्जावधी क्रिकेट रसिक कामाला दूर ठेवून टीव्हीसमोर बसतात. तर, सटोडे आणि पंटर सट्टा बाजाराकडे डोळा लावून बसतात. प्रत्येक ओव्हरवर लगवाडी-खायवाडीचा खेळ रंगतो. मध्यभारतातील सट्टा बाजार नागपुरातून संचालित होतो. येथील बुकींचे देशविदेशातील बड्या बुकींसोबत थेट कनेक्शन आहे. कुणी येथून दिल्ली, मुंबईत तर, कुणी गोव्यात आणि कुणी बुकी थेट दुबईसह विविध देशात कटिंग (सट्ट्याची उतारी) करतात. या लगवाडी, खायवाडीतून एका दिवशी एक बुकी कोट्यवधींची तर, छोटे बुकी आणि त्यांचे पंटर लाखोंची हारजीत करतात. दोन वर्षांपूर्वी देशभर खळबळ उडवून देणाऱ्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी नागपुरातील मनीष गुट्टेवार, बाबूराव यादव हे क्रिकेटपटू तसेच सुनील भाटिया आणि मुन्ना ऊर्फ किरण ढोले हे बुकी अशा चौघांना अटक केली होती. तर, छोटू अग्रवालने दिल्लीत आत्मसमर्पण केले होते. या कारवाईमुळे नागपुरातील बुकी चक्क मॅच फिक्स करतात, हेसुद्धा उघड झाले होते. त्यामुळे पोलीसांनी काही दिवसांपूर्वी बुकींची यादीच तयार केली. त्यांच्यावर नजर असल्यामुळे येथील सट्टा बाजार काही दिवसांपासून थंड होता. मात्र, बड्या बुकींनी स्पॉट चेंज करीत विश्वचषकाच्या निमित्ताने पुन्हा सट्टा बाजार गरम केला.
मध्यभारतात लागला १२५ कोटींचा सट्टा
By admin | Published: February 16, 2015 3:39 AM