मुंबई : राज्यात जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१५ ते २०१८ या कालावधीत १२ हजार ६३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती शुक्रवारी विधानसभेत लेखी उत्तरात देण्यात आली.राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात अजित पवार यांच्यासह अन्य सदस्यांनी लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी लेखी उत्तरात माहिती दिली.२७ फेब्रुवारी २००६च्या शासन निर्णयानुसार मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्याबाबत चौकशीच्या काळात सदर व्यक्ती शेतकरी होता किंवा कसे याबाबतचे निकष सुधारण्यात आले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयाने शेतीसाठी, शेती सुधारण्यासाठी कर्ज घेतले होते किंवा कसे याबाबत निकष सुधारण्यात आले आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था व मान्यताप्राप्त सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास व या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास संबंधित व्यक्तीला मदतीसाठी पात्र ठरवण्यात येते, अशी माहिती या वेळी देण्यात आली.केवळ १९६ कुटुंबीय मदतीस पात्र२०१५ ते २०१८ कालावधीत १२ हजार ०२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ६ हजार ८८८ आत्महत्यांची प्रकरणे निकषात बसत होती. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी केवळ १९६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी निकषाप्रमाणे आर्थिक मदतीसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत.
३ वर्षांत १२,६३१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्यभरात भीषण स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 2:36 AM