ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ : शहरात गेल्या काही दिवसात डेंग्यूसदृश तापाचे तब्बल १२८ रूग्ण आढळून आले असून हे रूग्ण आढळलेल्या ३८ भागांमध्ये मनपाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविली जात आहे. त्यापैकी २४ भागातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरीत १७ भागातील सर्वेक्षण मंगळवारी पूर्ण केले जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.
शहरात व जिल्ह्यात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरात तर डेंग्यूसदृश तापाचे आतापर्यंत तब्बल १२८ रूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण ज्या भागांमध्ये आढळले आहेत, त्या भागांची यादीच मनपाने तयार केली आहे. तब्बल ३८ भागांचा त्यात समावेश आहे. या ठिकाणी मनपातर्फे स्थापन करण्यात आलेल्या पथकांकडून सर्वेक्षण सुरू आहे. त्यात या भागात घरोघरी जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी केली जात असून पाण्यात डेंग्यूची अळी असल्याचे आढळून आल्यास तो पाणीसाठा फेकून देऊन भांडी रिकामी करण्यात येत आहेत. अथवा त्यात अबेटींग केले जात आहे. तसेच परिसरात धुरळणी केली जात आहे. यासंदर्भात आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोमवारी सकाळी आरोग्य, हिवताप व दवाखाने विभागाची बैठक घेतली. त्यात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
३७१८ घरांचे सर्वेक्षण पूर्णमनपातर्फे तापाचे संशयित रूग्ण आढळून आलेल्या ३८ भागांपैकी सर्वाधिक १०१ रूग्ण आढळलेल्या २४ भागांचे सर्वेक्षण मनपाच्या पथकांनी पूर्ण केले आहे. त्यात ३७१८ घरांची तपासणी करण्यात आली. या घरांमधील एकूण ९७५२ पाण्याची भांडी तपासण्यात आली. त्यापैकी १७२ घरांमध्ये २३९ पाण्याच्या भांड्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.त्यापैकी २१३ भांड्यांमध्ये अबेटींग करण्यात आले. तर उर्वरीत भांड्यांमधील पाणी फेकून देण्यात आले. तर २२ तापरूग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.