पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रतिमतदार १०० रुपये खर्च येणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी साडेतेरा कोटी रुपये खर्ची पडतील, असा अंदाज महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला. याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला जाणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले. महापालिका आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना आराखडा तयार केला आहे. त्यासाठी खर्चाच्या तरतुदीचा समावेश केला आहे. निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनास निवडणुकीसाठी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. प्रत्येक मतदारासाठी १०० रुपये खर्च गृहीत धरला आहे. गेल्या निवडणुकीत प्रत्येक मतदारामागे ३५ रुपये खर्च केला होता. यंदा त्यात तिपटीने वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ पर्यंत पोहोचली आहे. यात सुमारे साडेतेरा लाख मतदार आहेत. प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे एकूण साडेतेरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांमधील खर्चाची आकडेवारी लक्षात घेऊन २०१२ मध्ये महापालिकेला प्रतिमतदार ३५ रुपये असा खर्च निश्चित केला होता. मात्र, साहित्य सामग्रीत झालेली वाढ, अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या मानधन भत्त्यात झालेली वाढ, मतदान केंद्रांच्या संख्येतील वाढ, संगणक - इंटरनेटच्या वापराचा खर्च, प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे, प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेऊन मतदारयादी निर्दोष करण्याकरिता योजलेल्या उपाययोजनांवरील खर्च अपेक्षित आहे, असे वाघमारे म्हणाले.(प्रतिनिधी)>मतदारजागृती अभियानाच्या प्रसिद्धीसाठी होणारा खर्च, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची देखभाल, सुरक्षा, प्रशिक्षण यावरील खर्च, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे जादा मतदान यंत्रे, मतमोजणी आणि इतर उपाययोजनांवरील खर्च, निवडणूक संकेतस्थळ व त्यावर अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनांवर वाढीव खर्च होणार आहे.
निवडणुकीसाठी १३ कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 1:23 AM