मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ गावांमध्ये १३ विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) विकसित केली जाणार आहेत. यातील रेवस रेड्डी सागरीकिनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गानजीक ११ विकास केंद्र उभारली जाणार आहेत. यातील बहुतांश विकास केंद्र किनारपट्टीला लागून असून, यातून कोकणातील पर्यटन व्यवसाय आणि कृषिक्षेत्राला चालना दिली जाणार आहे.
राज्याला ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. मात्र नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असूनही कोकणाचा असंतुलित विकास झाला आहे. सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, किल्ले अन्य पर्यटनस्थळे आहेत. तसेच हापूस आंबा, काजू, नारळ आणि सुपारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. आता ऐतिहासिक स्थळे, पर्यटन ठिकाणे आणि कृषी उत्पादन क्षेत्रांच्या नजीक नवनगरे विकसित करून त्याद्वारे विकास साधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
पालघरमध्ये दोन केंद्रांचा समावेश पालघर जिल्ह्यात वाढवण आणि केळवा येथे दोन विकास केंद्र आहेत. औद्योगिक पट्ट्यात ही विकास केंद्र असल्याने त्याअनुषंगाने त्यांचा विकास साधला जाणार आहे. कोकणातील अन्य ११ विकास केंद्रांमध्ये पर्यटन आणि कृषिक्षेत्राला चालना देण्याचा मानस आहेत. त्यातून या क्षेत्रांच्या परिसराचा नियोजित विकास साधणे शक्य होणार आहे. सिडको किंवा अन्य प्राधिकरणे भूसंपादन करून नवनगरे वसवतात, त्याप्रमाणे या ग्रोथ सेंटरमध्ये कोठेही भूसंपादन केले जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.