मुंबई, दि . 13 - आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रम, बॅनर, फलक, हारतुरे यावर खर्च ना करता ती रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी जमा करावी, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले होते. त्यानुसार जमा झालेली 13 लाख 17 हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजच्या बैठकीत सुपूर्द केला आहे.
वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी कार्यक्रम, बॅनर, फलक, हारतुरे यावर अनावश्यक खर्च करू नये, असे आवाहन राजकारणी मंडळीकडून केले जाते, मात्र त्याला खूप प्रतिसाद मिळत नाही. कृषीमंत्री फुंडकर यांनी मात्र बडेजाव न मिरवता वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून समाजापुढे व राजकारण्यांपुढे आदर्श ठेवला आहे.
विविध पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी हारतुरे आणू नयेत, बॅनर लावू नये, असे आवाहन करत असतात, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाला मोठे गुच्छ न देता पुस्तक भेट द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला विविध मंत्र्यांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे.
कृषीमंत्री फुंडकर यांचा आदर्श राजकारण्यांना घेण्यासारखा आहे. मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीतून बळीराजाला आपत्ती, नैसर्गिक संकटात तातडीने मदत केली जाते. फुंडकर यांनी 13 लाखांचा निधी देऊन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.