पुणे : पवित्र पोर्टलद्वारे राज्यभरात शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये अभियोग्यता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखत न घेता शिक्षक पदावर नियुक्ती करण्यास १३ संस्थांनी संमती दिली आहे. या संस्थांच्या १ हजार २४१ शिक्षकांच्या जागा आता थेट गुणवत्तेच्या आधारे भरल्या जाणार आहेत. यामुळे पात्रधारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्य शासनाने गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती व्हावी यासाठी पात्रताधारक उमेदवारांची अभियोग्यता चाचणी घेतली. या चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांच्या सर्व जागांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.मात्र, खासगी संस्थाचालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे संस्थाचालकांना एका जागेसाठी दहा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास शासनाकडून संमती देण्यात आली.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागांच्या सर्व जागा या मुलाखत न घेता थेट गुणवत्तेच्या आधारावरच घेतल्या जाणार आहेत. मात्र केवळ अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न निर्माण झाला होता. खाजगी संस्थांकडून एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जाईल. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असेल. त्याचबरोबर या मुलाखतींमध्ये दहा जणांमधील अभियोग्यता चाचणीत कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड झाल्यास, त्या निवडीवरून शंका, न्यायालयात याचिका असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे मुलाखत न घेता शिक्षक भरती प्रक्रिया करावी असे प्रयत्न शिक्षण आयुक्त कार्यालयातून करण्यात आले. यास यश आले असून आतापर्यंत १३ संस्थांनी याला मान्यता दिली असून त्यांच्या १ हजार २४१ जागा केवळ गुणवत्तेच्या आधारावर भरल्या जाणार आहेत.पवित्र पोर्टलकडे १ लाख २३ हजार डी.टीएड., बी.एड. पात्रताधारक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे. या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदविण्यासाटी मुभा देण्यात येणार आहे. उमेदवारांची प्रोफाइल अपडेट करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून त्यांनी आता अर्ज स्वप्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. अर्ज स्वप्रमाणित केल्याशिवाय त्यांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही असे पवित्र पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे. ..........उच्च न्यायालयातील याचिकेमुळे भरती प्रक्रिया थांबलीइंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव ठेवाव्यात व बी.एड. उमेदवारांना प्राथमिकच्या वगार्ना शिकविता देता यावे यासाठी दोन याचिका दाखल झाल्या आहेत. इंग्रजीच्या याचिकेवर २९ एप्रिलला तर बी.एड.च्या याचिकोवर १५ एप्रिलला सुनावणी आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया पुढे सुरू केली जाणार आहे.........इतर संस्थांनीही अनुकरण करावेराज्यातील १३ संस्थांनी शिक्षक भरतीच्या जागा मुलाखत न घेता थेट अभियोग्यता चाचणीच्या गुणांवर भरण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. इतर संस्थांनीही याचे अनुकरण केल्यास शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता येईल. त्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने त्या त्या जिल्हयातील संस्थाचालकांना निवेदन देणार आहोत.-संतोष मगर, राज्य अध्यक्ष, डि.टीएड, बी.एड. पात्रताधारक संघटना
गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरतीला १३ संस्थांची संमती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:30 PM
चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांच्या सर्व जागांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.मात्र, खासगी संस्थाचालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.
ठळक मुद्देमुलाखतीशिवाय भरणार १२४१ जागा : पात्रताधारक उमेदवारांकडून स्वागत