मुंबई : राज्यात गेल्यावर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. एकूण अपघातांमध्ये सुमारे ११ हजार मृत्यू म्हणजे ८० टक्के मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातांबाबत जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले असून त्याच्या शुभारंभाप्रसंगी रावते बोलत होते.
रावते यांनी सांगितले की, राज्यात वाहनांची संख्या ३ कोटी २९ लाख इतकी झाली असून त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. अपघातांची आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. तरी अपघात रोखण्यासाठी सर्वांनी रस्ते सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. वाहनांच्या वेगाबरोबर अपघातांची आणि त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा तर अती वेगामुळे मृत्यूचा सापळा झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक व कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. पण शासनाने हेल्मेटची सक्ती केली, असे म्हणत या चांगल्या मोहीमेबाबत अपप्रचार केला जात आहे. वृत्तपत्रांनीही या मोहीमेला ‘सक्ती’ असे न म्हणता हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अपघाती मृत्यूमध्ये तरूणांचे प्रमाण अधिकपरिवहन आयुक्त शेखर चन्ने यावेळी म्हणाले की, राज्यात ३ कोटी ४१ लाख इतके परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यात अपघातांचे प्रमाण ०.३६ टक्क्यांनी कमी झाले असले, तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र ४ टक्क्यांनी वाढले आहे. पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी यांच्या अपघातांचे प्रमाण हे ६६ टक्के इतके आहे. अपघाती मृत्यूमध्ये २५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. राज्यात १ हजार ३२४ इतके ब्लॅक स्पॉट असून ते काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात २०१६ मध्ये १२ हजार ९३५, २०१७ मध्ये १२ हजार ५११ तर २०१८ मध्ये १३ हजार ५९ अपघाती मृत्यू झाले आहेत.
मुंबईत सीसीटीव्हीमुळे कारवाईत वाढमुंबई शहरात अतीवेग आणि बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी २०१७ मध्ये ४१ हजार कारवाया करण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे १ जानेवारी २०१८ पासून शहरात अशा ७ लाख ७० हजार लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी दिली. वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर सध्या मुंबईत ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येत असून लवकरच संपूर्ण राज्यात ही यंत्रणा सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.