औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने बेकायदेशीर वाटप केलेली १३ आलिशान चारचाकी वाहने गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) भरारी पथकाने जप्त केली आहेत.औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतून ही वाहने जप्त करण्यात आली असून, आणखी सात वाहनांचा शोध सुरू आहे. यातील काही वाहनांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे पुढारी करीत आहेत.एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी चारचाकी वाहन खरेदीची योजना महामंडळाकडून राबविली जाते. सर्व नियम धाब्यावर बसवून मर्जीतील लाभार्थ्यांना २०१४-१५ या वर्षात आलिशान चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले होते. महामंडळातील घोटाळ्याची चौकशी करणारे ‘सीआयडी’चे भरारी पथक गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात तळ ठोकून आहे. पोलीस निरीक्षक ए. एस. लंबे, जगदाळे व साळुंके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने औरंगाबाद येथून सात, तर जालना आणि बीड येथून प्रत्येकी तीन, अशी १३ वाहने जप्त केली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून लहू नामदेव सरोदे, कडुबा सुंदरलाल मावस, सुरेश एकनाथ फाजगे, धर्मराज तुकाराम मिसाळ, संभाजी माधवराव संभाळकर, शिवाजी रामभाऊ घोडके आणि सुभाष नागोजी मिसाळ तर जालना जिल्ह्यातून राजेंद्र गणेश थोरात, कैलास रामदास फाजगे आणि योगिराज तुकाराम मिसाळ आणि बीड जिल्ह्यातून जप्त करण्यात आलेल्या वाहनांत संतोष वैजनाथ पाटोळे, रामेश्वर केरू घोरपडे आणि बाबू यशवंत गायकवाड यांच्याकडील वाहनांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)एकाच दिवसात फेडले कर्ज१महामंडळातर्फे वाहन खरेदीसाठी लाभार्थ्यांना कर्ज दिले जाते. लाभार्थ्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची खरेदी करून उदरनिर्वाह करणे अपेक्षित असते; परंतु बहुतांश लाभार्थ्यांनी इनोव्हा, फॉर्च्युनर, डस्टर, बोलेरो अशी आलिशान वाहने खरेदी केली होती. राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी मातंग समाजातील लाभार्थ्यांच्या नावावर ही वाहने घेतली असल्याचे बोलले जाते. २लहु सरोदे आणि कडुबा मावस यांच्या नावावर बोलेरो आणि इनोव्हा वाहने घेण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे पुढारी या वाहनांचा वापर करीत असल्याचे बोलले जाते. वाहन कर्जाची सीआयडी चौकशी सुरू होताच ८ लाख ७७ हजार ४६२ रुपये आणि १८ लाख ४५ हजार रुपयांच्या थकबाकीचा एकाच दिवसात भरणा करण्यात आला. ३महामंडळाच्या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणे अपेक्षित आहे. या गरीब लाभार्थ्यांकडे एकाच दिवसात थकबाकीची रक्कम भरण्यासाठी लाखो रुपये कुठून आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाभार्थ्यांच्या जबाबातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांची नावे पुढे आली आहेत.
साठे महामंडळ घोटाळ्यातील १३ वाहने जप्त
By admin | Published: August 15, 2015 1:32 AM