मुंबई, दि. 9 - सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिलेल्या १३ वर्षीय मुलीने शुक्रवारी सकाळी मुलाला जन्म दिला आहे. बाळ आणि आईची प्रकृती ठीक असल्याचे सर जे. जे. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी या बलात्कार पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी दिली होती. मात्र शुक्रवारी सकाळी सिझेरियन पद्धतीने या मुलीची प्रसूती झाली. नवजात मुलाचे वजन १.८ किलो असून, मुदतपूर्व प्रसूती झाल्याने या बाळाला नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवण्यात आले आहे. पीडित मुलीच्या जिवाला धोका असल्यामुळे तिची मूदतपूर्व प्रसूती करण्यात आली आहे. याची कुटुंबीयांना कल्पना देण्यात आली होती, त्यांच्या परवानगीनंतर ‘सिझेरियन’द्वारे ही प्रसूती करण्यात आली.वीस आठवड्यांनंतर गर्भपात करणे शक्य नसते त्यामुळे जिवाला धोका संभवू शकतो. त्यामुळे मूदतपूर्व प्रसूतीचा पर्याय स्वीकारण्यात आला, असे डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले.भारतात २० आठवड्यांवरील गर्भपातास कायद्याने परवानगी नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर गर्भपाताची मुदत ही वाढवून २४ आठवडे करण्यात यावी, अशीही मागणी पीडितेच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी साहाय्य करणाºया प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण ?कांदिवली चारकोप येथील १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिसरात राहणाºया एका तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. मुलीचे वजन वाढू लागल्यानंतर तिला थायरॉईड तर नाही ना, अशी शंका येऊन पालकांनी तिलाडॉ. निखिल दातार यांच्याकडे नेले. मात्र मुलीला दिवस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली. त्यानंतर डॉ. दातार यांनी या मुलीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मदत केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली होती. डॉ. दातार यांनी यापूर्वीही महिलांना गर्भात दोष असल्याने २० आठवड्यांनंतर गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मदत केली होती.