अजित मांडके, ठाणेशाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचे डिजिटलायझेशन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात एकीकडे शासन प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर या आदिवासी तालुक्यातील १३४ शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित केला असून गेली अनेक महिने या शाळांमधील हजारो विद्यार्थी अंधारातच शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ३४१ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी अजून संगणकाचे तोंडही पाहिले नसल्याचे उघड झाले आहे. आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्यामध्ये गोरगरीब आदिवासी व कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुमारे ४८६ प्राथमिक शाळा सध्या सुरू आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व शाळा डिजीटल शाळा करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. परंतु, शाळांमध्ये संगणकच न पोहचल्याने शिक्षण विभागाकडून व जिल्हा प्रशासनाकडून पालकांची दिशाभूल व गोरगरीब मुलांना संगणक शिक्षणापासून वर्षानुवर्षानुवर्षे वंचित ठेवले आहे. ४८६ पैकी फक्त १२७ शाळांमध्ये संगणक शिकण्याची सोय असून ३४१ शाळांमध्ये अद्याप एकही संगणक पोहचलेला नाही, तर संगणक मिळालेल्या शाळांमध्ये वीजपुरवठा वीज बिल न भरल्याने महावितरणे खंडित केला आहे. अनेक शाळा संगणकाशिवाय, लाईट व पंख्यांशिवाय सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करावा लागत आहे. शाळेचे विजेचे बिल भरण्यासाठी शिक्षण विभागाने व जिल्हा प्रशासनाने आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे १३४ शाळा अंधारात आहेत. याला शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन जबाबदार असून हीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षणाबद्दल सातत्याने गळा काढणाऱ्या शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण हक्क विधेयकाचे उल्लंघन असून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार रामनाथ मोते हे मुंबई उच्च न्यायालयात लवकरच जनिहत याचिका दाखल करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १३४ शाळा अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2015 2:23 AM