खामगाव (बुलडाणा): शाळा विरहीत वस्त्यांमध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाण्यासाठी शासनाच्यावतीने वाहतूक सुविधा पुरविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २0१५-१६ करिता अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील १३६१ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २00९ मधील प्रकरण कलम ८ (ब) नुसार बालकांना प्राथमिक शाळा ही त्यांच्या घराशेजारी उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे; मात्र ज्याठिकाणी नजिकची शाळा उपलब्ध नाही अशा ठिकाणच्या वस्त्यामधील ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना वाहतूक भत्ता मिळणार आहे. १ कि.मी. परिसरात प्राथमिक शाळा व ३ कि.मी. परिसरात उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध करुन देता येत नसेल, तर अशा वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा पुरविण्याची तरतूद आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रक सन २0१५-१६ च्या शैक्षणिक वर्षाकरिता संबंधित जिल्ह्याकडून शिक्षण विभागाकडे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार विभागातील अमरावती जिल्ह्यातील वाहतूक सुविधेसाठी प्राथमिक ३९ व उच्च प्राथमिक ३७४, अकोला जिल्हा प्राथमिक ३६७ व उच्च प्राथमिक २१ तसेच बुलडाणा जिल्ह्यातील प्राथमिक १११ व उच्च प्राथमिक ४५१ असे एकूण १३६१ विद्यार्थी वाहतूक भत्यासाठी पात्र ठरले आहेत. वाहतूक सुविधेसाठी प्रथम एसटी महामंडळाच्या मासिक पास सुविधेचा विद्यार्थ्यांना लाभ देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. इयत्ता ५ वी व ८ वीच्या ज्या मुला-मुलींना शासनाच्या मोफत सायकल योजनेचा लाभ मिळाला असेल त्यांना ही सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
**शैक्षणिक वर्षासाठी मिळणार ३ हजार
ज्या मुलांना नजिकच्या नियमित प्राथमिक शाळेत जाण्या-येण्यासाठी एसटीची सोय नसेल तिथे अधिकृत खासगी वाहनाची सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक महिन्याकरिता ३00 रुपये याप्रमाणे १0 महिन्याकरिता ३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.