दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव आदिवासीवाडीवरील मुलांनी शेतात एरंडीची फळे खालल्याने जवळपास चौदा मुलांना विषबाधा झाली. या विषबाधा झालेल्या मुलांना तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
सध्या कोरोनामुळे शाळांना सुटी दिल्याने महाडमधील दासगाव आदिवासीवाडीवरील मुलांनी शनिवारी जंगलात फिरण्यास गेले असता एरंड फळांची बोंडे खाल्ली. यामुळे या मुलांना चक्कर येणे, उलटी, जुलाब असा त्रास जाणवू लागला. यामुळे भयभीत झालेल्या पालकांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. त्यानंतर या मुलांना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार करण्यात आले असून या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर आफ्रिन खतीब यांनी सांगितले.
हे वृत्त समजताच महाडचे आमदार भरत गोगावले यांनी सरपंच दिलीप उकिर्डे यांच्यासह रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आफ्रिन खतीब यांच्यासह आरोग्य सेवक दीपक हाटे, आरोग्य सहाय्यक एम. एम. मेहता, परिचारिका एन.के.गडवले, एस. एस.जोशी शिपाई आर. आर. पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री १२ नंतर या मुलांची प्रकृती स्थिर झाली.
या मुलांमध्ये गणेश जाधव (८), अमोल हिलम (१२), प्रेम हिलम (७), ज्ञानेश्वर जाधव (८), पार्वती जाधव (१२), शिरीष जाधव (१२), वैदेही हिलम (५), अमित पवार (५), गणगी हिलम (१२), निर्मला पवार (८), सोनू हिलम (१०), चांदणी हिलम (१०), प्रियांका हिलम (१२), सखाराम जाधव (१२) यांचा समावेश आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विषबाधा झालेली मुले.