ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ - विविध आरोपांच्या चक्रव्यूहात सापडल्यामुळे एकनाथ खडसे यांना शनिवारी महसूलमंत्रीपदासह सर्वच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. खडसे यांच्या राजीनाम्याने त्यांचे जळगावमधील समर्थक नाराज झाले आहेत. खडसे यांच्या समर्थनार्थ जळगावमधील भाजपच्या १४ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
पक्षाने खडसे यांचा राजीनामा घेतल्याने त्यांचे समर्थक संतापले आहेत. काल खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जळगावमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थकांनी दुकाने बंद करायला भाग पाडले तसेच रस्त्यावर उतरुन जाळपोळही केली. दुसरीकडे जळगावात शिवसैनिकांनी फटाके फोडून खडसे यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले होते.
खडसे यांच्याप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी १४ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. सध्या जळगाव महापालिकेत सुरेश जैन यांच्या खान्देश आघाडीची सत्ता आहे. जळगावमधील भाजपचे आणखी काही पदाधिकारीही खडसे यांच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याची शक्यता आहे.