पुणे : राज्यात दुष्काळ पडल्याने अनेक शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणीच करता आली नाही. शेतीसाठी पाणीच नसल्याने उन्हाळी पीक पेरणीही करपली आहेत. राज्यातील उन्हाळी पिकाच्या सरासरी क्षेत्राच्या अवघ्या ३२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असून गेल्या वर्षापेक्षा यंदा उन्हाळी पिकांचे १४ टक्के घटले आहे.पावसाने यंदा महाराष्ट्रावर चांगलीच अवकृपा दाखवली. राज्यातील काही भागातील खरिपाच्या पिकांना आणि त्यानंतर बहुतांश भागात रब्बी पिकांना वेळेवर पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात रब्बी पिकांच्या पेरण्याच होऊ शकल्या नाही. त्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात यंदा उन्हाळी पिकांच्या पेरणीत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात उन्हाळी पिकाचे सरासरी १.६८ लाख हेक्टर क्षेत्र असून आत्तापर्यंत केवळ ०.५२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात औरंगाबाद विभाग वगळता इतर विभागात उन्हाळी पिकांची पेरणी सुरू आहे.नागपूर विभागात उन्हाळी पिकांची सर्वाधिक ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण विभागात ४३ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असून भात पिकाची लावणी व भुईमूग पिकाच्या पेरणीची कामे सुरू आहेत. नाशिक विभागात २२ क्षेत्रांवर पेरणी झाली असून पुणे विभागात केवळ ११ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर कोल्हापूर विभागात २१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून उन्हाळी भुईमूग फांद्या फुटण्याच्या अवस्थेत तर मका पीक उगवणे ते वाढीच्या अवस्थेत आहे. लातूर विभागात केवळ ९ टक्के क्षेत्रावर तर अमरावती विभागात २४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात उन्हाळी मका व भूईमुग पीक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. राज्यात उन्हाळी मका पिकाचे सरासरी क्षेत्र २४ हजार ६९९ असून आत्तापर्यंत ७ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. तर भूईमुगाच्या ८२ हजार २४४ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ९ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.विशेष काळजी...कृषी विभागाने भूईमुग, मका आणि आंबा पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कृषी सल्ला केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. भूईमुगावरील पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी आळी यावर नियंत्रण आणण्यासाठी औषधे सुचवली आहेत. तर उन्हाळ्यात भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
पाण्याअभावी १४ टक्के पीक घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 7:07 AM