- मिलिंदकुमार साळवे, अहमदनगरश्रीरामपूर (अहमदनगर) : अंगारे, धुपारे न देता, फक्त श्रद्धेवर भक्तांना आत्मशांती मिळवून देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत विज्ञानाच्या चमत्कारामुळे पवन ऊर्जेतून मिळालेल्या उत्पन्नातील १४ कोटी रुपये आले आहेत.अहमदनगरजवळील भोयरे पठार येथील डोंगर रांगांवर संस्थानने १५ कोटी ४० लाख रुपये खर्चून २.५ मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. २०१४-१५ आर्थिक वर्षात त्यातून ४४ लाख ८८ हजार ८१ युनिट वीजनिर्मिती झाली. ती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस विकण्यात आली. त्यातून संस्थानला २०१४-१५ मध्ये २ कोटी १४ हजार ४९२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रकल्प कार्यान्वित केल्यापासून साईबाबांच्या संस्थानरूपी झोळीत मार्च २०१५ अखेर १४ कोटी २२ लाख १६ हजार ६०१ रुपये एवढी रक्कम जमा झाली. २०११-१२ मध्ये ४८ लाख ४० हजार ९९७ युनिट वीजनिर्मिती होऊन संस्थानला १ कोटी ९४ लाख ४९ हजार २३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१०-११ मध्ये पवन ऊर्जा प्रकल्प व कार्बन क्रेडिटद्वारे २ कोटी २ लाख २९ हजार १३० रुपये मिळाले होते. २०१२-१३ मध्ये पवन ऊर्जा प्रकल्पातून २ कोटी ५ लाख २७ हजार ३७२ रुपये इतका महसूल मिळाला.
पवन ऊर्जेतून सार्इंना १४ कोटींचे दान
By admin | Published: December 29, 2015 1:45 AM