मुंबई : पालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहनावरून दसऱ्याच्या दिवशी सेना आणि भाजपामध्ये झालेल्या राड्याप्रकरणी नवघर पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली आहे. मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने सर्व आरोपींना २७ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी मुलुंडच्या नीलमनगर मैदानात भ्रष्टाचाररूपी रावण दहनाची तयारी सुरू असताना सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. सेना आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात भाजपाचे सहा कार्यकर्ते आणि सेनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी करीत भाजपा नेत्यांनी आंदोलन केल्यानंतर नवघर पोलिसांनी या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली होती. भाजपाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आणखी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली.नवघर पोलिसांनी अटक केलेल्या उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी, अनंत म्हाब्दी, महेंद्र वैती, शाखाप्रमुख अविनाश बागुल, दीपक सावंत, आनंद मुंडे, महेश चवरे, बाबा भगत, दिनेश जाधव, उपशाखाप्रमुख सुनील गारे, नीलेश ठाकूर, किरण नांदे, नीलेश सावंत, किशोर भोईर यांना आज दुपारी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. आमदार सुनील राऊत, आमदार अॅड. अनिल परब, दत्ता दळवी यांच्यासह शेकडो शिवसैनिक या ठिकाणी गोळा झाले होते. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात बॅरिकेट्स लावून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)
मुलुंड राड्यातील आरोपींना १४ दिवसांची कोठडी
By admin | Published: October 14, 2016 3:21 AM