लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना आटोक्यात आल्याने राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. नवीन नियमावली ४ मार्चच्या मध्यरात्री १२ पासून अंमलात येणार आहे. संबंधित १४ जिल्ह्यांमध्ये सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम सभागृहे किंवा मैदानाच्या ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचादेखील समावेश आहे.
या जिल्ह्यांमधील शाळा, काॅलेज, ऑफलाइन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या १४ जिल्ह्यांची निश्चिती करताना पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण, दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त, पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी, आयसीयूमधील ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांहून कमी प्रमाणात भरलेले असणे हे निकष लावण्यात आले आहेत. या जिल्ह्यांना ‘अ’ श्रेणीत ठेवले आहे. अन्य जिल्हे ‘ब’ श्रेणीत आहेत.
- सार्वजनिक क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व आस्थापनांच्या स्टाफला लसीकरण आवश्यक.
- सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण आवश्यक.
- मॉल, थिएटर, नाट्यगृह, पर्यटनस्थळ, उपाहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी भेटी देणाऱ्या अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण आवश्यक.
- कारखान्यांमधील कामगारांचे पूर्ण लसीकरण अनिवार्य असेल.
१०० टक्के क्षमतेने ‘हे’ सुरू
शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्वीमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क
- खासगी आणि सरकारी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी.
- सार्वजनिक ठिकाणी १००% क्षमतेने कामकाजाची मुभा, इतर जिल्ह्यांमध्ये हे ५० टक्क्यांपर्यंत असेल.
- १४ जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांत संबंधित सेवांना ५० टक्के क्षमतेची मर्यादा असेल.
- सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
- ५० टक्के उपस्थितीची मर्यादा: सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम सभागृहे किंवा मैदानाच्या ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी दिली आहे.
- २२ दिवसांपासून नवे रुग्ण एक लाखाच्या आत राहिलेले आहेत. गेल्या २४ तासांत ८,८७१ रुग्ण बरे झाले. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लसीच्या १७७.५० कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही त्यात म्हटले आहे.
- हो, अर्थातच मास्कची सक्ती कायम: राज्यभरात मास्क वापराची सक्ती कायम असेल. मध्यंतरी अशी सक्ती मागे घेणार असल्याची चर्चा होती.