ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २२ - सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची योजना आखणा-या इसिसच्या संशयितांना एनआयएने देशाच्या विविध भागात छापा मारुन अटक केली आहे. एनआयएने मुंबईतून दोन, उत्तरप्रदेशमधून दोन, कर्नाटकमधून सहा जणांना आणि हैदराबादमधून चौघांना अटक केली आहे.
'इसिस' ( इस्लामिक स्टेट) या कुख्यात दहशतवादी संघटनेची मुळे आता मुंबईपर्यंत पोहोचल्याची शंका असून एटीएस व एनआयने संयुक्तरित्या कारवाई करून ठाण्यातून 'इसिस'च्या एका संशयिताला अटक केली आहे. इसिसशी संपर्कात असल्याचा आरोप त्या तरूणावर असून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केली. अटक करण्यात आलेला हा तरूण मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे समजते.
दरम्यान इसिसशी संपर्कात असल्याच्या संशयावरून कर्नाटकातूनही दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. कर्नाटकातील मंगळुरू आणि टुमकूरमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यातच मुंबईच्या मालवणी परिसरातील काही तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघाल्याचे वृत्त होते, तर त्याआधी मे २०१४ मध्ये कल्याणमधील चार युवक इसिसमध्ये सामील होण्यासाठी सीरियाला रवाना झाले होते, त्यातील एक तरूण अरीब माजिदला देशात परत आला असून सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे.