ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.19 - समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देतांना वाहनावरील ताबा सुटल्याने, लक्झरी बस रस्त्याखाली उतरून झाडाला धडक देत खड्यात पलटी झाली. यात बसमधील १४ प्रवाशी जखमी झाले. हा अपघात अमळनेर-पारोळा रस्त्यावरील भोकरबारी धरणाजवळ आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर चालक, सहचालक वाहन सोडून फरार झाले.
अमळनेरहून पारोळ्याकडे खाजगी लक्झरी बस (एमएच १९-वाय. ७०७१) येत होती. भोकरबारी फाट्याजवळून चालकाने लक्झरी बस सहचालकाला (क्लिनर) चालविण्यास दिली. त्याने थोड्या अंतरापर्यंत बस चालवली. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली उतरत, झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर दोन-तीन पलट्या खात २० ते २५ फूट खड्यात गेली. ही बस झाडावर आदळली नसती,तर बस जवळच असलेल्या विहिरीत पडली असती.बस झाडावर आदळताच, चालक, सहचालकाने बसमधून उड्या घेत अपघातस्थळावरून पळ काढला. दरम्यान शेतकऱ्यांनी जखमींना रूग्णालयात हलविले.