ऑनलाइन लोकमतलोहारा/माकणी, दि. 04 - लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्प मंगळवारी पहाटे पाच वाजता शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे १० सेंटीमिटरने उघडून प्रती सेकंद २१ क्युसेक प्रमाणे पाणी नदी पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, यानंतरही प्रकल्पात पाण्याचा वेग वाढत असल्याने दुपारी दोन वाजता सर्वच १४ दरवाजे १० सेंटीमिटरने तर दुपारी तीन वाजता या १४ पैकी चार दरवाजे २० सेंटीमिटरने उघण्यात आले असून, यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पात १ जूनला केवळ २.१२१ दशलक्ष घनमिटर इतकाच पाणी साठा होता. यावर्षी पावसाळा सुरु झाला त्यात सुरूवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे प्रकल्पातील साठ्यात काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, मागील पाच-सहा दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पात चांगले पाणी वाढत आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १२१ दलघमी इतकी असून, २३ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत यात ३५.६०९ दलघमी इतका पाणीसाठा होता. २४ सप्टेंबर रोजी तो ५४.३७४ दलघमीवर पोहोंचला. यानंतर मात्र मागील पाच-सहा दिवसातील पावसामुळे साठ्यात वाढ होत जावून मंगळवारी पहाटे हा प्रकल्प शंभर टक्के भरला. त्यामुळे पहाटे पाच वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटीमिटरने उघडून प्रती सेकंद २१ क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर प्रकल्पात पाण्याचा वेग वाढत असल्याने अकरा वाजता दोन, बारा वाजता दोन तर दुपारी तीन वाजता सर्वच १४ दरवजे १० सेंटीमिटरनेने उघडण्यात आले. मात्र, त्यानंतरही प्रकल्पात पाण्याची अवक वाढतच असल्याने १४ पैकी चार दरवाजे २० सेंटीमिटरने उघडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, उपविभागिय अधिकारी व्ही. जी. कांबळे, शाखाधिकारी डी.व्ही. कदम, शाखाधिकारी योगीराज माने, शाखाधिकारी आर. डी. भंडारे, बी. एस. बारुळे, एस. एम. कंदले, पी. एम. मंडोळकर, भाल जाधव, धनाजी कदम, ए. एस. कोळी, एम. जी. डांगे आदी कर्मचारी धरणाच्या पाणी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
माकणी-लातूर रस्ता बंदमागील आठ वर्षांपासून मृतसाठ्यात आलेला माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प मंगळवारी ‘फुल्ल’ झाल्यानंतर धरणाचे सर्वच दरवाजे उचलून यातील पाणी तेरणा नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे माकणी-लातूर मार्गावरील पूल पाण्याखाली येवून वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय नदी पात्रावरील सारणी, जूने सास्तूर, रेबे चिंचोली, राजेगाव या गावाना आतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राजेगाव येथील बंधाऱ्याचेही सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
बाजारकरूंचे हालमाकणी येथे मंगळवारी आठवडी बाजार असल्याने मातोळा, हसलगण, देवतळा, लोहटा, सारणी येथील नागरिक बाजारासाठी माकणी येथे येतात. मात्र, दुपारी आचानक पुलावरून पाणी वाढल्याने व वाहतूक बंद झाल्याने बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची तारांबळ झाली. लातूर व औसा आगाराच्या येणाऱ्या सर्वच बसगाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. तसेच तेरणा धरणाच्या व तेरणा नदी परिसरातील हजारो एकर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला.