आगरदांडा : ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची दुरवस्था होऊनसुद्धा संवर्धन होत नाही. त्यामुळे या किल्ल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवजयंती उत्सवानिमित्त -कल्याणच्या सेक्रेड हार्ट स्कूलच्या १४ विद्यार्थ्यांनी जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग किल्ला हे अंतर समुद्रातून पोहून पार करीत शिवरायांना अभिवादन केले.
खवळलेल्या समुद्रात उतरून १२ ते १८ वयोगटातील मुलांनी आठ किलोमीटरचे अंतर पार केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जलदुर्गाकडे लोकांचे लक्ष वेधता यावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी, अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सेक्रेड हार्ट शाळेचे क्रीडा शिक्षक- रामचंद्र म्हात्रे यांनी दिली.
या उपक्रमात कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, मयंक पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे, शिक्षक रामचंद्र म्हात्रे, काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेंद्र साळुंखे, नीलेश पाटील हे सहभागी झाले. मुलांसोबत किल्ल्यात जाण्यासाठी प्रकाश सरपाटील, गजानन सरपाटील व बंधू सरपाटील यांनी बोट उपलब्ध करून दिली होती.
किल्ल्याचे संवर्धन करूमुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुरुड जंजिरा नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे हे स्वत : पाण्यात उतरले. त्यांनी पद्मदुर्ग किल्ल्याला भेट देत झालेल्या दुरवस्थेची पाहणी केली. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याचे संवर्धन व जतन झाले पाहिजे. याकरिता शासनाकडे पाठपुरावा करू आणि पद्मदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.