मुंबई : म्हाडाच्या ९७२ घरांसाठी १० आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. या घरांसाठी प्राधिकरणाकडे तब्बल १ लाख ३६ हजार ५७७ अर्ज दाखल झाले आहेत.म्हाडाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १९१, अल्प उत्पन्न गटासाठी ४१७, मध्यम उत्पन्न गटासाठी २२८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १३६ अशा एकूण ९७२ सदनिका आहेत. सभागृहात उपस्थित राहून सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता अर्जदारांना १० आॅगस्ट रोजी रंगशारदा नाट्यगृहाबाहेरील मंडपात सकाळी ८ ते ९ या वेळेत प्रवेशिका दिल्या जातील. ज्या अर्जदारांना प्रवेशिका उपलब्ध होणार नाहीत; त्यांना सभागृहाबाहेरील मंडपातील मोठ्या पडद्यावर सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.प्रवेशिका मिळविण्यासाठी अर्जदाराचे स्वत:चे ओळखपत्र आणि अर्जाची मूळ पावती आणणे बंधनकारक असणार आहे. अर्जदाराकडे अर्जाची मूळ पावती नसल्यास प्रवेशिका मिळणार नाही. एका व्यक्तीला एकच प्रवेशिका मिळणार आहे; शिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण संकेतस्थळावर करण्यात येणार असून, सायंकाळी ६नंतर सोडतीचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
म्हाडाच्या प्रत्येक घरासाठी १४० अर्जदार
By admin | Published: August 09, 2016 4:10 AM