मुंबई : मुंबई विद्यापीठाला गेल्या १७ महिन्यांपासून परीक्षा विभागाचे प्रमुखपद भरता आलेले नाही. त्यासाठी पात्र व्यक्ती मिळत नसल्याची कबुली विद्यापीठ प्रशासनाने माहिती अधिकार कायद्यान्वये दिली आहे. हे पद भरण्यासाठी दोन वेळा जाहिरात दिल्यानंतरही योग्य उमेदवार मिळालेला नाही. या पदाच्या जाहिरातीसाठी तब्बल १ लाख ३९ हजार ११८ रुपये खर्च आला असून, सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार अन्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रांतून ही बाब समोर आली आहे.सहायक कुलसचिव विकास डवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ आॅक्टोबर, २०१५ व १६ आॅगस्ट, २०१६ रोजी जाहिराती देण्यात आली. त्यासाठी अनुक्रमे ९१ हजार ७६८ व ४८ हजार ४८ रुपये खर्च झाला. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी नियुक्त केलेल्या समितीचे डॉ. अभय पेठे, डॉ. सिद्धेश्वर गडदे आणि डॉ. अशोक महाजन यांनी २४ पैकी चार इच्छुकांची नावे पात्र केली. मात्र, कुलगुरूंनी ९ मे २०१६ रोजी एकही उमेदवार योग्य नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर पुन्हा जाहिरात दिल्यानंतर छाननी समतीचे अभय पेठे, डॉ. विजय जोशी, डॉ. मुरलीधर कुऱ्हाडे आणि डॉ. उदय साळुंके यांनी १४ पैकी १० इच्छुकांची नावे पात्र केली होती; पण ५ आॅक्टोबरला झालेल्या बैठकीत कुलगुरू देशमुख तसेच निवड समितीने एकही उमेदवार योग्य नसल्याचा निर्वाळा देत पुन्हा जाहिराती देण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
परीक्षा नियंत्रकपदाच्या जाहिरातीसाठी १.४० लाख खर्च
By admin | Published: January 19, 2017 6:01 AM