सुनील काकडे,
वाशिम, दि. 1 - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देणे, संगणकाद्वारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत तीन टप्प्यात जिल्ह्याला तब्बल १४०० संगणक मिळाले. मात्र, तज्ज्ञ प्रशिक्षक तथा आवश्यक सुविधांअभावी यातील बहुतांश संगणक आजमितीस अडगळीत पडून असल्याची बाब लोकमतच्या पाहणीत उघड झाली.
केंद्र शासनाने ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेतलेल्या प्रकल्प नियंत्रण आणि मुल्यमापन गटाच्या बैठकीत संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये आयसीटी योजना राबविण्यास मान्यता दर्शविली. या योजनेची अंमलबजावणी बीओओटी तत्वावर (बिल्ड ओन आॅपरेट अॅण्ड ट्रान्सफर) करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, जिल्ह्यात तीन टप्प्यात १४० शाळांमध्ये संगणक लॅब उभारण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ शाळांना प्रती शाळा १० संगणक संच आणि प्रत्येकी १ आॅपरेटर, इलेक्ट्रीक देयक यासह तत्सम सुविधा पुरविण्यात आल्या. त्यात रिसोड तालुक्यात रिसोड, रिठद, मोप येथील श्री शिवाजी विद्यालय, कवठा चिखली येथील पंडित नेहरू विद्यालय, मानोरा तालुक्यातील मानोरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय, शेंदूरजना येथील आप्पास्वामी विद्यालय, कडोळी येथील बाबनाजी महाराज विद्यालय, वाईगौळ येथील तपस्वी काशीनाथ बाबा हायस्कुल आश्रमशाळा, धामणी येथील एलएसपीएम विद्यालय, मालेगांव तालुक्यातील मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय, जऊळका रेल्वे, किन्हीराजा येथील श्री शिवाजी विद्यालय, शिरपूर येथील कोंडबातात्या ढवळे विद्यालय, मुंगळा येथील मोरेश्वर विद्यालय आणि खंडाळा येथील समाज प्रबोधन विद्यालयाचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ५६ शाळा या योजनेसाठी पात्र ठरल्या; तर तिसऱ्या टप्प्यात तब्बल ६७ शाळांमध्ये आयसीटी योजनेतून संगणक लॅब उभारण्यात आली. असे असले तरी १४० शाळांपैकी बहुतांश शाळांमधील संगणक लॅब चक्क बंद असून तज्ज्ञ प्रशिक्षक, विद्यूतची सोय नसणे, इमारतींची दुरवस्था आदी कारणांमुळे अनेक ठिकाणचे आजही धूळखात पडून आहेत. परिणामी, शासनाचा मूळ उद्देश असफल झाला असून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी या महत्प्रयासानंतरही संगणकीय शिक्षणात माघारला आहे.