बँकेत बचत खाते : मालमत्ताही खरेदी केलीनागपूर : माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी १९९६ ते ३१ आॅगस्ट २०११ पर्यंत नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहात होते, असे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यापैकी २५ पाकिस्तानी नागरिकांची जरीपटका येथील साधना सहकारी बँकेत बचत खाती आहेत. तसेच अनेकांनी ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. असंख्य पाकिस्तानी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैधपणे वास्तव्यास असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते एजाज खान नूर खान व अन्य सहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. उपरोक्त माहिती याचिकाकर्त्यांनी मिळविली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिकांना विशिष्ट मुदतीसाठी व वर्तणूक चांगली ठेवण्याच्या अटीवर भारतात राहण्याची परवानगी दिली जाते. तत्पूर्वी सर्व प्रकारची चौकशी केली जाते. दीर्घ मुदतीचा व्हिसा नाकारल्यानंतर संबंधित पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून जावे, अशी सूचना पोलीस अधीक्षक /पोलीस उपायुक्त यांना केली जाते. परंतु, संबंधित नागरिक भारत सोडून जात नाहीत व त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जात नसल्याचे आढळून आले आहे. काही पाकिस्तानी नागरिक वर्षाकाठी दहा-बारा वेळा भारतात येत असल्याची उदाहरणे आहेत. कायद्यानुसार एका पाकिस्तानी नागरिकांला एका वर्षामध्ये केवळ एकदाच भारतात प्रवेश करता येतो. काही पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या नावाने पाच-सहा पासपोर्ट तयार करून भारतात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी नागरिक लपून राहिले तर हेरगिरी होण्याचा धोका आहे, असे गुप्तवार्ता विभागाच्या एका पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय गृह विभागाचे अवर सचिव (विदेशी नागरिक) विकास श्रीवास्तव यांनी यापूर्वी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोवा येथे तब्बल ४८२ विदेशी नागरिकांनी अनधिकृतरित्या जमीन खरेदी केली आहे. व्हिसाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर २०१०, २०११ व २०१२ या तीन वर्षात भारतातून २२ हजार ५९१ अवैध विदेशी नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून त्यात १०४ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. याचिकाकर्ते यावर प्रत्युत्तर सादर करणार आहेत. त्यासाठी, आज, बुधवारी याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी न्यायालयाला दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला.(प्रतिनिधी)
नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक
By admin | Published: June 12, 2014 1:13 AM