यदु जोशी,मुंबई- शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले तर आपले किमान १४५ आमदार निवडून येतील, असा मोठा प्रवाह भाजपात आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांतील निकालाच्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेतला जात आहे.शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाकडून राष्ट्रवादीशी युती करून सत्ता टिकविली जाईल, असे बोलले जात असले तरी भाजपांतर्गत असा कुठलाही विचार नाही. रा.स्व.संघाच्या धूरिणांनीदेखील राष्ट्रवादीसोबत जाण्याची गरज नाही. प्रसंगी मध्यावधी निवडणुकीची तयारी ठेवावी लागेल, असे सूचित केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ८३५२८३१० मतदार होते. त्यातील ५२६९१७५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अलिकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (नगरपालिकांसह) ५९८२७३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. १९८ विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रातील २१२ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या. भाजपा आणि मित्र पक्षांची बेरीज केली तर १९८ विधानसभा मतदारसंघांमध्ये १८१९०४२१ मते मिळाली असून त्याची सरासरी टक्केवारी ३०.४० इतकी आहे. मात्र, मुंबई वगळता अन्य नऊ महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत होती. एका मतदाराने चार मते दिली. त्यामुळे नऊ महापालिकांमधील एकूण मतांना चारने विभागले असता तितकी संख्या वजा करून भाजपाला महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या तिन्ही निवडणुकांत भाजपाला १ कोटी २० लाख ११५९७ इतकी मते मिळाली. याचाच अर्थ भाजपाला २८.१९ टक्के इतकी मते मिळाली. ही मते राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने विचारात घेतली तर एकूण मते १७४७१४१४ इतकी होतात. या मतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकूण १४७०९२७६ इतक्या मतांशी तुलना केली असता मध्यावधी निवडणूक झाली तर भाजपाला १४५ हून अधिक जागा मिळतील, अशी मांडणी भाजपाने केली आहे. >सरासरी २८.१९ टक्के मतेभाजपाला जिल्हा परिषदेत ६३७६०५४, मित्र पक्षांना ६८४५२८ मते मिळाली. नगरपालिकांत भाजपाला १३५४८१२ मते तर त्याच्या मित्र पक्षांना ८५७३० मते मिळाली. मुंबई पालिकेत भाजपाला १४००५०० इतकी मते मिळाली. मित्र पक्षांना ५०३६५ मते मिळाली. अन्य नऊ पालिकांत भाजपाला ८११७२८९ तर मित्र पक्षांना १२११४३ मते मिळाली. याचा अर्थ भाजपा आणि मित्र पक्षांना १८१९०४२१ मते मिळाली. नऊ महापालिका - ३५.८९, मुंबई महापालिका - २८.९२, जि.प. (२५) - २७.३६, नगरपालिका- २३.८२ टक्के मते भाजपाला प्राप्त झाली.
मध्यावधी झाल्यास १४५ जागा; भाजपाचा दावा
By admin | Published: March 04, 2017 6:09 AM