चंद्रपूर : येथील रामाळा तलावालगतच्या रेल्वे क्रॉसिंगजवळील नाल्यात सोमवारी दुपारी १४९ जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यात ११ मास्केटचा समावेश आहे. रामाळा तलावालगत असलेल्या रेल्वे क्रॉसिंग परिसरात एक नाला असून त्या ठिकाणी एक मच्छीमार मासे पकडत असताना सर्वप्रथम त्याला हे काडतुसे दिसले. त्याने त्यातील काही काडतुसे हातात घेऊन ते जवळच्याच एका पानठेला चालकाला दाखविले. पानठेला चालकाने ती वस्तू काडतुसे असल्याचे सांगून याबाबत चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाचे सुरेश खेमेकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. खेमेकर यांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन खातरजमा केली. ही बाब रामनगर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. रामनगरचे ठाणेदार पी.आर. गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठून ‘सर्च आॅपरेशन’ राबविले. त्यात १३८ काडतुसे व ११ मास्केट पोलिसांच्या हाती लागले. याबाबत लगेच जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर स्वत: राजीव जैन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सापडलेल्या काडतुसांपैकी किती काडतुसे जिवंत आहेत, याची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, घटनास्थळावर दोन गार्ड तैनात करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्याला लागूनच गडचिरोली जिल्हा आहे. त्यामुळे चंद्रपुरात काडतुसे सापडण्याची घटना गंभीर मानली जात आहे. यापूर्वीदेखील रामाळा तलाव परिसरात अनेकदा काडतुसे सापडले आहेत.
चंद्रपुरात सापडली १४९ काडतुसे
By admin | Published: June 24, 2014 12:52 AM