ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - खासगी अॅप बेस टॅक्सी कंपन्या त्यांच्या सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण काहीवेळा या कंपन्यांकडून तांत्रिक पद्धतीने पाठवले जाणारे बिल ग्राहकांना जोर का झटका देणारे असते. मुलुंड येथे रहाणा-या सुशील नरसायन यांना असाच अनुभव आला. ते 1 एप्रिलचा दिवस कधीही विसरणार नाहीत. मुलुंड पश्चिम ते वाकोल मार्केट इतक्या अंतरासाठी खासगी एसी टॅक्सीचे बिल जास्तीत जास्त 400 ते 500 रुपये होऊ शकते.
पण ओलाने इतक्या अंतरासाठी सुशील यांना चक्क 149 कोटींचे बिल पाठवून जोर का झटका दिला. सुशील यांनी 1 एप्रिलला मुलुंड येथील रहात्या घरातून वाकोला मार्केटला जाण्यासाठी ओलाची टॅक्सी बुक केली. पण ड्रायव्हरचा मोबाईल बंद झाल्याने त्याला सुशील यांच्या घरापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे सुशील यांनी स्वत:च चालत जाऊन टॅक्सीचा पिकअप पॉईंट गाठला. तो पर्यंत चालकाने भाडे रद्द केलेले होते.
त्यानंतर सुशील यांनी दुसरी टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर मुलुंड पश्चिम ते वाकोल मार्केट या अंतरासाठी बिलाचा जो आकडा दिसला त्याने सुशील यांना चांगलाच धक्का दिला. सुरुवातीला त्यांना कंपनी एप्रिल फुलचा जोक करतेय असे वाटले. त्यांना दुसरी टॅक्सी बुक करता येत नव्हती कारण 1,49,10,51,648 म्हणजे 149 कोटींचे बिल थकीत असल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला.
ओलाने त्यांच्या मोबाईल वॉलेटमधून 127 रुपयेही कापले होते. त्यांनी कंपनीशी संपर्क साधून इतके बिल कसे पाठवू शकता अशी विचारणा केली तेव्हा तांत्रिक चुकीमुळे हे घडल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीने कापलेले 127 रुपयेही त्यांना परत केले. यापूर्वीही काहीवेळा अन्य अॅप बेस टॅक्सी कंपन्यांनी ग्राहकांना तांत्रिक चूकीमुळे इतक्या रक्कमेची बिले पाठवली आहेत.