पंढरपूर : पूर्वी आषाढी वारी सोहळा हा १० ते १५ दिवस चालायचा, मात्र कालानुरुप त्यात बदल होत गेले आणि हा सोहळा केवळ दोन ते तीन दिवसांवर आला आहे़ कारण नोकरी, व्यवसायामुळे भाविकांना इतके दिवस थांबणे कठीण झाले़ त्यामुळे पांडुरंगाचे दर्शन झाले की, ‘तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा।।’ असे म्हणत वारकरी निघून जात असल्याचे दिसून आले.
सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन लाखो वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळा व दिंड्यांसमवेत पंढरीत येतात. पूर्वी आषाढी सोहळा झाल्यानंतर वारकरी राहुट्या किंवा मोकळ्या मैदानात विविध महाराजांचे कीर्तन, प्रवचन, भारुड ऐकण्यात दंग होऊन जात असत, शिवाय पांडुरंगाच्या या वैकुंठभूमीत राहण्याची संधी यानिमित्ताने मिळत असल्याने भाविक याच ठिकाणी दहा ते पंधरा दिवस राहायचे. ऊन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक संकटांशी सामना करीत पंढरपुरात राहत, असे कोल्हापूरचे विजय कदम सांगत होते.‘आषाढीला पाठ देऊन जाऊ नये’ असे पूर्वी म्हटले जायचे, त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यादिवशी एकही वारकरी परतीच्या प्रवासाला जात नव्हता़. यंदा याउलट चित्र दिसून आले़ कारण, आषाढी सोहळ्यादिवशी पदस्पर्श दर्शन नव्हे तर मुखदर्शन, नामदेव पायरी किंवा कळस दर्शन घेऊन अनेक भाविक परत गेल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील कराड नाका, सांगोला चौक या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम होण्याची समस्या अनेकांना अनुभवावी लागली.
बीडचे भाविक सुदाम कांबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, माउली, आता कुणालाही वेळ नाही़ जो-तो आपापल्या कामात व्यस्त असतो़ नोकरी, व्यवसाय करणाºयांचे तर काही खरे नाही़ एक-दोन दिवसाची सुट्टी घेऊन ते आलेले असतात. त्यामुळे पांडुरंगाची वारी पोहोच करून ते लगेच निघून जातात, असे त्यांनी सांगितले.
यावर्षी १२ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले होते, मात्र आषाढीदिवशीच निम्म्यापेक्षा जास्त वारी रिकामी झाली़ काही भाविक ६५ एकर परिसरात होते़ मात्र ते दोन दिवसांनी निघून गेले़ मंगळवारी गोपाळकाला असल्याने लाख ते दीड लाखच भाविक पंढरीत आहेत़ असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे़ गोपाळकाला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला लागतील़ त्यानंतर पंढरपुरातील गर्दी कमी होईल़
सोयी-सुविधा वाढल्याचा परिणाम
- - पूर्वी आषाढी वारीसाठी संतांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले की जोरदार पाऊस पडत होता़ तशा वातावरणातही वारकरी मजल दरमजल करत वारीसाठी येत होता़ कारण पावसाळा भरपूर असल्याने बहुसंख्य शेतकरी खरिपाची पेरणी उरकून आनंदाने पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी येत होता़ शिवाय पूर्वी बैलगाडी हे वाहतुकीचे माध्यम होते़ सध्या वाहनांची उपलब्धता झाली आहे़ त्यामुळे भाविक दर्शन झाले की लगेच गावी निघून जातात़ हे सर्व सोयी-सुविधा वाढल्याचा परिणाम असल्याचे जालन्याचे संपत मुळे यांनी सांगितले़