ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 4 - आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. नांदेडमध्ये आंदोलनकर्त्या शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. जवळपास 15 शेतक-यांवर जमावबंदीचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. येथील मालेगाव मार्गावर दौर व देगाव कुं येथील शेतकरी रस्त्यावर भाजीपाला, दूध फेकून आंदोलन करत असताना अर्धापूर पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.
संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत रविवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. पुणतांब्यात शनिवारी ग्रामसभा झाली, त्यात संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही आंदोलनाची धग कायम आहे. खान्देशातही संपाची धग कायम असली तरी बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात व्यवहार सुरू आहेत.