मुंबई: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे(38) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी 7 वाजता कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून 4 कि.मी. अंतरावर घडली. आता स्वाती ढुमने यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी 15 लाख रुपयांची मदत आणि स्वाती यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येण्याचे जाहीर केले आहे.
वनरक्षक स्वाती ढुमणे ताडोबा-अंधारी प्रकल्पात वाघाचे चिन्ह सर्वेक्षण करीत होत्या. कर्तव्यावर असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केलं. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतक स्वाती ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना व्यक्त केल्या. तसेच, वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच स्वाती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.
ताडोबात नेमकं काय घडलं ?ताडोबा-अंधारी प्रकल्पात स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह वाघांचे चिन्ह सर्वेक्षण(ट्रॉन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक 97 मध्ये सुमारे 200 मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला व जंगलात फरपटत नेले. ही बाब कळताच वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेहच आढळून आला.