मुंबई - संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षाची काळजी करू नये. खऱ्या अर्थाने जो सूर्याचा उदय व्हायचा तो जून २०२२ मध्ये झालेला आहे. एकनाथ शिंदेंनी तो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सूर्य एकच असतो, दुसरा होत नाही. राऊत आणि वडेट्टीवारांनी स्वत:च्या पक्ष अस्तित्वाची काळजी करा. २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे असं सांगत माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे म्हणाले की, आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आमदारांना टिकवण्यासाठी अशा बातम्या संजय राऊत, विजय वडेट्टीवार पसरवत आहेत. काँग्रेस आणि उबाठाचे काही आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यांची संख्या १५ आणि १० इतकी आहे. कुठे ना कुठे आपला पक्ष फुटू शकतो असं त्यांना वाटते. दुसऱ्याच्या उदयापेक्षा तुमच्या अस्ताची काळजी घ्या. पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून २३ जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार त्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या जातात. उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत. केंद्रातही राजकीय भूकंप होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून या घडामोडी सुरू आहेत. त्याची कुठेतरी चाहूल लागल्यामुळे संजय राऊत, विजय वडेट्टीवार पक्षाच्या अस्ताला वाचवण्यासाठी अशी विधाने करत आहेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच महाविकास आघाडीत अस्वस्थता दिसून येत आहे. ही आघाडी स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी झाली आहे. ज्याठिकाणी स्वार्थ निघून जातो, हातातील सत्ता जाते आणि पुढची महत्त्वाकांक्षा दिसून येत नाही तिथेच बिघाडी दिसते. स्वत:चे राजकीय अस्तित्व आणि पक्षाला वाचवण्यासाठी काही जण हातपाय पसरत आहेत असा टोलाही राहुल शेवाळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
दरम्यान, रायगड, नाशिक पालकमंत्र्याबाबत जो निर्णय झाला त्यामुळे शिवसेना आमदारांमध्ये नाराज आहेत. रायगडमध्ये ३ शिवसेनेचे आमदार आहेत. नाशिकमध्ये दादा भुसे आधी पालकमंत्री होते. आमदारांची जी नाराजी आहे ती पक्षांतर्गत व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिन्ही पक्षाला सोबत घेऊन चालायचे, समन्वय साधायचे तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही ही नाराजी दूर करतील. महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं.