गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल, भाजपासोबत जाणार अशा चर्चा होत होत्या. त्यानंतर अजित पवारांनी समोर येत स्पष्टीकरण दिले होते. आता पुन्हा अंजली दमानिया यांनी '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार' असे ट्विट केल्याने चर्चा सुरु झाली होती. यावर अंजली दमानिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मी मंत्रालयात गेले होते तेव्हा तिथे एक चांगले पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. ते भेटले होते. त्यांनी तुम्हाला काही सांगायचे असे असे म्हटले होते. यावेळी त्यांनी अजित पवार हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत बिलकुल दिसत नाहीएत. त्यांची आणि भाजपाची नक्कीच जवळीक दिसतेय. हे १५-१६ आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, असे सांगितले. मी त्यांना तेव्हा मग काय करायचे, असे विचारले आणि पुढच्या कामाला निघून गेले, असे दमानियांनी सांगितले.
आपण सारेच बघतोय आज महाराष्ट्रातील बँकेचा घोटाळा बाहेर काढला जातोय. जरंडेश्वरवर कारवाई होतेय. आजचीच बातमी पाहिली तर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे नाव जरंडेश्वर चौकशीतून वगळण्यात आले. दोन कंपन्या गुरु कमोडिटीज व स्पार्कलिंग सॉईल आहेत. यापैकी स्पार्क्लिंगमध्ये सुनेत्रा या २००४ ते २००८ या काळात सरळसरळ संचालक होत्या. असे असूनदेखील त्यांची चौकशी न होणे आणि नाव वगळणे हे सगळे एक प्रकारचा दबाव बनवायचे आणि विरोधी पक्षातील जे कोणी असतील त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे ही भाजपाची स्ट्रॅटेजी राहिली आहे, असा आरोप दमानिया यांनी केला.
भाजपाची वॉशिंग मशिन असे लोक म्हणतात. भाजपा ईडीचा यासाठी सर्रास गैरवापर करत आहे. हे सगळे मुद्दे जोडले तर ईडीची चौकशी, चार्जशीट फाईल होणे, दोघांना वगळले जाणे व योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही १५ तारखेला येणार आहे. पत्रकारांनी सांगितल्यानंतर मी जेव्हा रात्री घरी आले तेव्हा मी विचार करत बसले. हे सर्व किळसवाणे, अतिशय राग येतोय हे राजकारण पाहून. कुठेतरी हे सगळे बंद झाले पाहिजे असे वाटते. हे बंद करणार तरी कोण कारण आता सगळेच पक्ष एका माळेचे मणी आहेत, असा आरोप दमानिया यांनी केला.