मुंबई : धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजमितीला ६४ टक्के अधिक पाणीसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे गेले वर्षभर सुरू असलेली मुंबईतील १५ टक्के पाणीकपात पालिका प्रशासनाने बुधवारी मागे घेतली़ मात्र, सध्याचा पाणीसाठा क्षमतेच्या केवळ ५५ टक्के असल्याने केवळ राजकीय दबावामुळे प्रशासनाने पाणीकपात रद्द करण्याची घाई केल्याचे समजते़महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी असल्याने पाणीकपात लवकरात लवकर रद्द करून घेण्यासाठी शिवसेना व भाजपाच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती़ मात्र, सध्या तलावांच्या एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर क्षमतेपैकी केवळ ७ लाख ९३ हजार ०५१ दशलक्ष लीटर पाणीसाठा असल्याने आणखी महिनाभर तरी वाट पाहण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती़ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून तसे स्पष्ट केले होते़ गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा ३३ टक्के जादा पाऊस जुलै महिन्यापर्यंत झाला आहे़ त्यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सध्या ६४ टक्के जादा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ त्या आधारावर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी अचानक पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली़ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नसताना पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़ प्रशासनाने केवळ राजकीय दबावाला बळी पडत हा निर्णय घेतल्याचे समजते़ (प्रतिनिधी)>व्यावसायिक पाणीकपातही रद्द व्यावसायिक पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात आली होती़, तर जलतरण तलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ हा पुरवठाही आता पूर्ववत होईल.पाणीपुरवठा आजपासून पूर्ववत होणार : गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून १५ टक्के पाणीकपात सुरू असल्याने ३,२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़ ही कपात रद्द झाल्याने मुंबईकरांना आता दररोज पूर्वीप्रमाणेच ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे़ सध्या केवळ १६७ दिवसांचा पाणीसाठा : मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे अपेक्षित आहे़ म्हणजेच ३६५ दिवसांचा साठा हवा आहे़ मात्र आजमितीस १६७ दिवसांचा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ पावसाळ््याचे अद्याप दोन महिने आहेत. ते संपण्याआधीच पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़
मुंबईतील १५ टक्के पाणीकपात अखेर पालिकेकडून रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 5:38 AM